Saturday, February 1, 2014

दाजीपुर

दाजीपुर अभयारण्य
भारतातील अतिसंवेदनशील ठिकाण असणार्‍या पश्चिम घाटात राधानगरी म्हणजेच दाजिपुर अभयारण्य आहे.दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगलपट्टा आहे.निमसदाहारीत जंगल प्रकारात याचा समावेश होतो.कोल्हापुर जिल्हयाच्या पश्चिमेस असणार्‍या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मि. आहे.समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फ़ूट असून येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मी.मी. आहे.
दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्यचाच एक भाग आहे. पूर्वी हे जंगल शिकारी करता राखीव होते. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यावर सन १९५८ ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली.महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून याची नोंद आहे.राधानगरी व काळम्मावाडी धरणाच्या भोवतालच्या जंगल परीसराला मिळून सन १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभा खडकाचे मोठे सडे आहेत.सडयावर व सडयाच्या भोवताली असणार्‍या दाट जंगलामधे एक संपन्न जैवविविधता आढळते.
tigar
प्राणी:.राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३५ प्रकारच्या वन्यप्राण्याची नोंद झालेली आहे. यामधे दुर्मिळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ,बिबळ्या व फ़क्त पश्चिम घाटात आढळणारे लहान हरीण गेळा(पिसोरी) यांचा समावेश आहे. तसेच गवा, सांबर,भेकर,रानकुत्रा,अस्वल,चौसिंगा, रानडुक्कर, साळींदर,उदमांजर, खवलेमांजर,शेकरु, ससा,लंगूर याच बरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.
bird
पक्षी: निरीक्षणासाठी राधानगरी वन्यजीव अभयारण्य एक स्वर्गच आहे.राधानगरी अभयारण्यात आजमितीस २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे.यामध्ये ग्रेट पाईड हॉर्नबील, निलगीरी वूड पीजन, मलबार पाईड हॉर्नबील, तीन प्रकारची गिधाडे या संकटग्रस्त प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे.जगात फ़क्त पश्चिम घाटात आढळणार्‍या पक्षांपैकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात.अभयारण्यातील सांबरकोंड, कोकण दर्शन पॉईंट, सावर्दे, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदीर ही पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत.

orchid
वनस्पती:भारतातील राधानगरी अभयारण्याचे महत्व म्हणजे निमसदाहरीत व वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगल प्रकारामुळे असंख्य झाडांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे.डोंगरातील दर्‍याखोर्‍यातील घनदाट जंगल,विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्ष,वेली,झुडपे,ऑर्किड्स,फुले,नेचे, बुरशी आढळतात.अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. भारतातील द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथील भागात आहेत. ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडारआहे.करवंद,कारवी,निरगुडी,अडुळसा, तोरण,शिकेकाई,रानमिरी,मुरुडशेंग,सर्पगंधा, वाघाटी,धायटी इ. झुडपे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.
lizard
सरिसृप व उभयचर:सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली,सरडे,साप-सुरळी आढळतात.उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात.गांडुळासारखा दिसणारा देवगांडूळ यासारख्या पर्यावरणात महत्वाच्या पंरतू दुर्लक्षीत अश्या उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात.एका नव्या पालीच्या प्रजातीचा शोध प्रथमच राधानगरी येथे बी.एन.एच.एस. चे वरिष्ठ संशोधक यांनी लावला.त्या पालीचे नामकरण cenmaspis kolhapurensis करण्यात आले आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३३ प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे.ऑलिव्ह ‍फ़ॉरेस्ट स्नेक,एरिक्स व्हिटेकरी,पाईड बेली शिल्डटेल या दुर्मिळ सापांची नोंद झाली आहे.
butterfly
फ़ुलपाखरे:१२१ प्रजातींच्या फ़ुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे.सदन बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फ़ुलपाखरु (१९० मी.मी.) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फ़ुलपाखरु (१५ मी.मी.) आहे.ही दोन्ही फ़ुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमुन सामुहिक स्थलांतर करणारी ब्लु टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फ़ुलपाखरे या ठिकाणी ऑक्टो-नोव्हेंबर महिन्यात आढळतात
                                       
                                                                             (  BISON NATURECLUB)
                                                                                    RADHANAGARI
             

No comments:

Post a Comment